माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी कडून अटक 

0

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. देशमुख यांची काल (सोमवार) तब्बल १३ तास चौकशी नंतर रात्री १ वाजेच्या सुमारास अटकेची कारवाई करण्यात आली.जवळपास दोन महिने नॉट रिचेबल असलेले अनिल देशमुख काल स्वतःहून ईडी कार्यालयात दाखल झाले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते.

७१ वर्षीय देशमुख यांच्यावर पैशांची अफरातफर (पीएमएलए) तसेच मुंबईतील बार आणि हुक्का पार्लर मालकांकडून दरमहा १०० कोटींची वसुली तसेच पोलिस बदल्यांमधील गैरव्यवहार असे आरोप आहेत. देशमुख यांनी अनेक प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अधिक चौकशीसाठी ताब्यात घ्यावे लागले, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळी अनिल देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून ११ वाजेच्या सुमारास त्यांना विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान देशमुखांच्या अटकेनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी खोचक ट्वीट केलं आहे.’अनिल देशमुख हॅपी दिवाळी आणि अनिल परब मेरी ख्रिसमस? स्पेशल थँक्स टू नवाब मलिक आणि संजय राऊत,’ असं ट्वीट नितेश राणेंनी केलं आहे. नितेश राणेंच्या या ट्वीटची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसंच, या ट्वीटचा नेमका अर्थ काय?, असेही सवाल उपस्थित होत आहेत.

https://twitter.com/NiteshNRane/status/1455272028051841028

माझ्यावर आरोप करणारे परमबीरसिंग कुठे आहेत ? – अनिल देशमुख 

अनिल देशमुख काल ईडी कार्यालयात हजर झाले. त्यापूर्वी त्यांनी आपली भूमिका चित्रफितीद्वारे मांडली. त्यात ते म्हणतात, परमबीरसिंग भारत सोडून पळून गेल्याच्या बातम्या आहेत. माझ्यावर आरोप करणारी व्यक्तीच पळून गेली आहे. परमबीर यांच्याविरुद्ध पोलिस खात्यातील अनेकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. सचिन वाझे याने परमबीरसिंगच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. मी गृहमंत्री असताना त्याला नोकरीतून काढण्याची प्रक्रिया सुरू केली त्यामुळे त्याने माझ्यावर आरोप केले. परमबीर यांच्यासारख्या लोकांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप होत आहेत. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात असून याचे मला दुःख आहे, अशी खंत देशमुख यांनी व्यक्त केली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.