नाशिक (प्रतिनिधी )-कल्पना असो की वास्तव, त्याला छायाचित्रणाद्वारे उलगडत चौकटीतून मांडणाऱ्या सृजनशील मंडळींना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या “कलातीर्थ लघुपट महोत्सव – २०२२”चे आयोजन पूर्ण झाल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग आयोजित तसेच भारतीय चित्रसाधना, आयरीस आणि अस्तित्व निर्मिती यांच्या सह आयोजनात “कलातीर्थ लघुपट महोत्सव – २०२२” चे आयोजन करण्यात आले आहे. शंकराचार्य संकुल, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड येथे ०९ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता हा महोत्सव रंगणार असून सुप्रसिद्ध अभिनेते तथा नाशिकचे भूमिपुत्र चिन्मय उदगीरकर यांची प्रमुख उपस्थिती या महोत्सवाला लाभणार आहे.
महोत्सवात एक मिनिट आणि एक ते १० मिनिट अशा दोन प्रकारातील लघुपट स्वीकारले जाणार आहेत. कलातीर्थ महोत्सवाचे हे यशस्वी ५ वे वर्ष असून विजेत्यांना रौप्यपदक, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट लघुपटासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, संकलन, संगीत, कथानक, अभिनय आदी विभागात स्वतंत्र पारितोषिक असणार आहे.२५ डिसेंबर २०२१ ही लघुपट पाठविण्याची अंतिम तारीख असून इच्छुकांनी या लघुपट महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.