नाशिकमध्ये पावसाने ५४ वर्षातील विक्रम मोडला : साहित्य संमेलनावर पावसाचे सावट 

पावसामुळे संमेलन कार्यक्रमात व्यत्यय येणार नाही - स्वागताध्यक्ष छगन भुजबळ 

0

नाशिक – अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या ३ डिसेंबरपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक,नगर,मुंबई, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कालपासून नाशिक शहरात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. तशी माहिती भारतीय हवामान विभागानेच दिली आहे.

गेल्या २४ तासात नाशिकमध्ये ६३.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीची नोंद थेट १६ डिसेंबर १९६७ या दिवशीची आहे. त्यावेळी नाशिकमध्ये ३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच, तब्बल ५४ वर्षांनंतर नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यात उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. तसेच, आज व उद्या असे दोन दिवस नाशकात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे डिसेंबरमधील केवळ एकाच दिवसाची नाही तर संपूर्ण महिन्याचाच उच्चांकी पाऊस आता नोंदला जाईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

साहित्यसंमेलनावर पावसाचे सावट 

नाशिकमध्ये  ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी होणार आहे. कोरोनामुळे साहित्य संमेलनाचा मार्च आणि नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त हुकला होता. आता डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे सावट आलेलं पाहायला मिळत आहे.त्यात अवकाळी पावसामुळे संमेलनावर पावसाचे सावट पडले आहे.

काल सकाळपासूनच नाशिकमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्या. यामुळं साहित्य संमेलनाच्या मुख्य सभा मंडपात पावसाचे पाणी साचलंय, त्यामुळे ठिकठिकाणी चिखल झाला आहे. पावसाने जोर धरल्याने कवी कट्टा ,गझल कट्टा आणि बालसाहित्य मेळावा   हे तीन  कार्यक्रम खुल्या जागेतून सभागृहात घेतले जाणार आहेत. पुढील दोन तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळं साहित्यिकांसह रसिकांचीही मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली असून उपस्थितीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.परंतु आज सकाळपासून काहीप्रमाणात पावसाने उघडीप घेतली असली तरी वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा आला आहे.बाहेरगावहून संमेलनाला येणाऱ्या रसिकांनी व साहित्यिकांनी आपल्यासोबत गरम कपडे ठेवावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात येत आहे.

पावसामुळे संमेलन कार्यक्रमात व्यत्यय येणार नाही – स्वागताध्यक्ष छगन भुजबळ 

कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आवश्यक ती खबरदारी आपण घेतलेली आहे.पावसामुळे कुठलाही व्यत्यय येणार नाही यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच कार्यक्रमात कुठलेही बदल केले जाणार नाही. मुख्यमंडप हा पावसापासून पूर्ण संरक्षण होईल या पद्धतीने उभारण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी कुठलीही अडचण होणार नाही. केवळ जे कार्यक्रम आपण खुल्या व्यासपीठावर घेणार होतो ते कार्यक्रम इतर ठिकाणी हलविण्यात आले आहे. याठिकाणी पहिल्या पेक्षा अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तसेच जास्तीत जास्त नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच पाऊस सातत्याने सुरू राहिल्यास मंडपाच्या दोन्ही बाजूने चर खोदून पाणी जाण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

९४ व्या साहित्य संमेलनादरम्यान ‘हे’ नियम पाळणे बंधनकारक 

संमेलनात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तापमान चेक केल्यानंतच साहित्य संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे.ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या  ५० टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.