स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर १९४२ साली झाले नाशकातले पहिले संमेलन
साहित्य पर्वणी - लेखांक - २ , लेखक - डॉ. स्वप्नील तोरणे
डॉ. स्वप्नील तोरणे
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वाटचालीमध्ये साहित्य संमेलन ही महत्वाची घटना असते. वाचकांचा, रसिकांचा सहभाग यास मोठया प्रमाणावर लाभत आहे. विसाव्या शतकाने सामाजिक, सांस्कृतिक प्रबोधनाच्या अनेक चांगल्या परंपरा निर्माण केल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे भावजीवन समृध्द झाले आहे. या पैकीच एक म्हणजे साहित्य संमेलन. आज याला आलेले महासंमेलनाचे स्वरुप डोळे दिपवून टाकणारे आहे. सुमारे दीड शतकाची वाटचाल असलेल्या परंपरेचा साहित्यरथ आज ९४ व्या संमेलनाच्या उंबरठयावर आहे. या निमित्ताने डॉ. स्वप्नील तोरणे यांनी घेतलेल्या काही निवडक संमेलनांचा मागोवा…’’
येत्या तीन डिसेंबर पासून सुरु होणारे साहित्य संमेलन हे एकूण ९४ व्या संमेलनांमध्ये नाशिकमधले तिसरे संमेलन होय. २००५ साली के.टी.एच.एम. महाविद्यालयात दुसरे संमेलन झाले होते, तर तब्बल ७९ वर्षांपूर्वी १९४२ साली नाशकात पहिले साहित्य संमेलन झाले होते. बेचाळीसचे वर्षच मुळी स्वातंत्र्यसंग्रामाच्या अत्यंत धामधुमीचे होते. दुसऱ्या महायुध्दानंतर ब्रिटीशांची जागतिक स्तरावर झालेली पिछेहाट आणि देशात सत्याग्रह, क्रांतिकारी चळवळी, चलेजावचा उठाव, “सायमन गो बॅक” चे नारे अश्या देशप्रेमाच्या स्फुलिंगाने भारलेल्या या काळात नाशिकला पहिल्या वहिल्या साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले होते. साहित्य संमेलने सुरु झाल्यापासून संपन्न होणारे हे सत्तावीसावे संमेलन होते.
साधेपणाने, कमी खर्चात चित्रमंदीर सिनेमागृहाच्या परिसरात हे संमेलन झाले. स्वातंत्र्य संग्रामाच्या विविध चळवळींमध्ये अश्या स्वरुपाच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर ब्रिटीश शासनाचे असंख्य निर्बंध होते, तरीही नागरिकांनी असंख्य अडचणींवर मात करुन हे संमेलन यशस्वी करुन दाखविले. तिनशेच्यावर लोक उपस्थित राहणार नाही, असा कयास लोक करीत असतांना पाचशेपेक्षा अधिक रसिकांनी या संमेलनात पूर्णवेळ हजेरी लावली असल्याची माहिती मिळते. अर्थात याचे प्रमुख कारण म्हणजे या संमेलनात अध्यक्षपदी निवडून आलेले प्रचंड लोकप्रिय असलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे होय.
अत्रे साहेबांचे या काळात नाशकात सतत जाणे-येणे असायचे. त्यांच्या पत्नी या गर्व्हमेंट गर्ल स्कुलच्या मुख्याध्यापिका होत्या. अत्रे साहेब खरे तर यापूर्वी दोनदा अध्यक्ष होऊ शकले असते, मात्र १९४० च्या रत्नागिरीच्या संमेलनाप्रसंगी निवडणूकीत ना. सि. फडके यांचा अर्ज होता, तर नंतरच्या संमेलनात वि.स. खांडेकर अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. यामुळे या दोन्ही साहित्यिकांचे जेष्ठत्व लक्षात घेऊन विनयशिलतेने आचार्यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. आचार्य अत्रेंचे अध्यक्षीय भाषण हे नेहमीच्याच थाटात घणाघाती झाले. संमेलनाचे त्या काळातले स्वरुप लक्षात घेऊन त्यांनी अगदीच कोणाची भंबेरी उडवली नसली, तरीही हळूच चिमटे काढत आणि चापटया मारत त्यांनी अनेकांना शालजोडीतले उपहार दिले.
विव्दताप्रचुर साहित्यिकांकडून विनोदी आणि ललीत साहित्याची मानहानी केली जाते यावर भाष्य करतांना आचार्य म्हणतात, ’’विनोदी वाङ्मयाच्या सद्यकालीन स्वरूपाची तर पूर्वीच्या दोघांही अध्यक्षांनी खरमरीत निर्भत्सना केलेली आहे. अर्थात् ह्या बाबतीतली त्यांची मते आपल्यासारख्या सुज्ञांस मान्य नसावीत असा माझा तर्क आहे. नाही तर आपण ह्या वर्षी एका विनोदी लेखकाची संमेलनाच्या अध्यक्षस्थानी खचित निवड केली नसती. ’’असा टोमणा मारतात. ललीत साहित्याबद्दल ते म्हणतात,’’
’’ललित वाङ्मय हे सोपे आणि मनोरंजक असते, हा काही त्याच्या नित्कृष्टपणाचा पुरावा नाही. उलट दुर्बाेध गोष्टी सोप्या शब्दांत सांगता येणे हीच उत्कृष्ट साहित्याची कसोटी आहे. बहुजन समाजासाठी निर्माण होणा-या ललित वाङ्मयावर फडके ह्यांनी गेल्या वर्षी आक्षेप घेतले आहेत. त्याचाही ह्या ठिकाणी विचार करण्यासारखा आहे. ते म्हणतात, ‘ज्या वेळी एखादी कला राजाश्रयापासून लोकाश्रयाकडे येते त्याचवेळी मोठा धोका उत्पन्न होतो. लोकांच्या आश्रयाखाली कला आली म्हणजे त्यावर लोकांची हुकूमत चालू लागते. ती कला लोकांच्या पायथ्याशी जाऊ लागते आणि त्यामुळे त्या कलेची आणि वाङ्मयाची अधोगती होते’, असे त्यांचे म्हणणे आहे.
राजे लोकांची परंपरा जगामध्ये जवळजवळ ‘कटाप’ होऊन आता राजसत्ता लोकसत्तेमध्ये सर्वस्वी विलीन होण्याची पाळी आली, तरी मध्ययुगातल्या भाटाप्रमाणे राजाश्रयाचे पोवाडे गात बसणे हे खरोखरच धारिष्टाचे आहे. वाङ्मयाला किंवा कलेला लोकांचा आश्रय मिळाल्याने ते वाङ्मय किंवा ती कला बिघडत तर नाहीच, पण त्यामुळे लोकांचा आनंद संवर्धित होऊन समाजाचे हित साधते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. तथापि, केवळ मनोरंजन करणे एवढेच ललित वाङ्मयाचे उद्दिष्ट नव्हे. समाजाच्या विविध जीवनावर प्रकाश पाडून त्या जीवनातील प्रागतिक प्रवृत्तींचा पुरस्कार करावयाचा हा ललित वाङ्मयाचा प्रधान हेतू आहे.
हरिभाऊ आपटे, देवल, कोल्हटकर, गडकरी आदी प्रमुख ललित लेखकांनी असा सामाजिक हेतू मनात धरून वाङ्मय निर्माण केलेले आहे. आज समाजात इतके उद्योग, इतके व्यवसाय, इतके धंदे आहेत, त्याचे पडसाद आमच्या ललित वाङ्मयात का पडू नयेत ? अत्रे साहेबांनी असा प्रश्न करुन त्यांनी नवलेखकांना साहित्य निर्मितीसाठी असंख्य विषय उपलब्ध करुन दिले.
या संमेलनाच्या आयोजनात अनेकांचा सक्रिय सहभाग होता. महाराष्ट्र नाटयमंदीराचे वामनराव पुरोहित यांनी संमेलनाचे निमंत्रण दिले आणि त्याचा स्विकार झाला. पुरोहित नाशिकमध्ये नाटयचळवळ निर्माण करणारे म्हणून सर्वपरिचित होते. १९४० मध्ये त्यांनी नाशकात नाटयसंमेलनाचे यशस्वी आयोजन करुन दाखविले होते. नाटकवाल्या माणसाचे साहित्यसंमेलनाचा घाट का घालावा अशी त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र कवीवर्य कुसुमाग्रजांनी त्यांना सक्रिय पाठिंबा दिला. त्यावेळेस तात्यासाहेब मुंबईतील एका वृत्तपत्रात नोकरी करीत असले तरी नाशिकमध्ये सतत जाणे-येणे असायचे.
पुरोहितांनी नाशिकमधील काही साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीतील लोकांना एकत्र घेऊन संमेलन समिती बनविली. यामध्ये डॉ. कुर्तकोटी, डॉ. अ.ना. भालेराव, वैद्य वामनशास्त्री दातार, ल.रा. पांगारकर, श्रीधरशास्त्री वारे, प्रल्हादपंत औरंगाबादकर, रमाकांत वेळवे यांनी प्रत्येक बाबतीत हिरिहिरीने सहभाग घेतला. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष वामनराव पुरोहित हे होते.
वामनरावांनी या संमेलनासाठी गावोगावी फिरुन निधी जमविला. ते दिवसच संघर्षाचे आणि समस्यांचे होते. त्यामुळे उदार निधी मिळविण्याची नोंदच नाही. मुळात संमेलन घ्यायचाच अनेकांचा विरोध होता त्यामुळे अगदी पंचवीस पैश्याच्या देणगीच्या नोंदी सापडतात. जेव्हा आचार्य अत्रे संमेलनाचे अध्यक्ष होणार असे जाहिर झाले त्यानंतर मात्र संमेलनांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत गेला. स्वतः अत्रे आणि ज्येष्ठ संपादक पा.वा. गाडगीळ यांनी संमेलनाची गरज लोकांना पटवुन दिली. ब्रिटीश शासनाने सर्वच राजकीय व्यासपीठांना, कार्यक्रमांना बंदी घातली असल्याने साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना एकत्र आणून त्यांच्यात स्वातंत्र्याबद्दलचे कळत-नकळत विचार मांडता येऊ शकेल अशी भूमीका घेतली आणि नाशिकच्या संमेलनात लोकाश्रय मिळत गेला.
या संमेलनाचे प्रमुख वैशिष्ठ म्हणजे आचार्यांचे भाषण होय. याबरोबर युध्द काळात हा वाडःमय निर्मितीस पोषक नसतो. आपले ललीत वाडःमय राष्ट्रीय शषेला पोषक नाही असे परिसंवाद नंतर बराच कालावधी चर्चेत राहिले. स्थानिक कलाकारांनी दोन रात्री नाटक, गीते, नृत्यांचा कार्यक्रम सादर करुन वाहवा मिळवली. ब्रिटीश राजवटीचा जाच, निर्बंध, निधीची चणचण एकवढेच काम तर लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी धान्य, साखर, रॉकेलचा साठा करायचा, मिळवायला देखील अत्यंत समस्या अश्या अनेक अडचणी असतांना नाशिककरांनी आपल्या वाटेत आलेले हे पहिले-वहिले साहित्य संमेलन आपल्या कार्यकतृत्वाने प्रशंसनीय ठरविले.
डॉ. स्वप्नील तोरणे
जनसंवाद तज्ज्ञ
आचार्य अत्रे महान व्यक्तिमत्त्व आणि स्वप्नील सराचा अभ्यासपूर्ण लेख खूप सुंदर माहिती. धन्यवाद