वेलकन्नी किसान एक्स्प्रेस दररोज सुरु करावी : मनसे मागणी

0

नाशिक ( प्रतिनिधी ) – शेतकऱ्यांचा शेतमाल देशाच्या विविध भागात पोहोचवण्यासाठी उपयुक्त असलेली वेलकन्नी किसान एक्स्प्रेस दररोज सुरु करावी. तसेच कोलकाता येथे जाणारी किसान एक्सप्रेस नव्याने सुरु करण्यात यावी अशी मागणी मनसेतर्फे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली. अशा मागणीचे निवेदन खा.हेमंत गोडसे यांच्याकडे मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांनी दिले.

देवळाली ते मुझफ्फरपूर ००१०७ ही किसान एक्स्प्रेस गेल्या वर्षी सुरु करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली ही पहिली किसान रेल्वे ठरली. दि. १५ सप्टेंबर २०२० पासून शेतकऱ्यांना भाड्यात ५० टक्के सबसिडी सुरु करण्यात आली. त्यामुळे गरीब शेतकरीही आपला शेतमाल देशभरात पाठवू शकतात. पण या गाडीला पार्सल डबे कमी असल्याने अडचणी येत आहेत. नाशवंत माल वेळेत पाठवू न शकल्याने वाया जाऊन नुकसान होते. ते टाळण्यासाठी यापूर्वीही निवेदन दिल्याने ३ ऐवजी ४ दिवस मान्य करण्यात आले. मात्र आजही रेल्वे ३ दिवसच धावते. ती दरदिवशी सोडण्यात यावी. तसेच कोलकात्यासाठी देखील स्वतंत्र ट्रेन सुरु करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध स्थानकांवर शेतमाल पाठवणे शक्य होईल.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या व शेतमालाचा आवाका बघता नाशिकरोड व मनमाड स्टेशनवर किसान एक्स्प्रेसला जास्त पार्सल डबे जोडण्याची आवश्यकता आहे. त्याने सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उभारी मिळण्यास मदत होईल. मध्यरेल्वेच्या विभागीय महाप्रबंधकांना तसे आदेश त्वरित देण्यात यावे अशी मागणी मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांनी केली आहे.

खा. हेमंत गोडसे म्हणाले, ही मागणी रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवले जाईल. तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन असे त्यांनी आश्वासन दिले. या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, मनसे सरचिटणीस, मनसे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे व सरचिटणीस विजय जाधव यांना देण्यात आले आहे.निवेदनावर ,मनसे उपजिल्हा अध्यक्ष सुरेश घुगे,सहकार सेनेचे नितेश जाजू , अक्षरा घोडके, विल्सन साळवी , सोनू आंधळे,दुर्गेश मोरे, स्वागता उपासनी, आदित्य कुलकर्णी , पंकज मिश्रा यांच्या सह्या आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!