नाशिकचे प्राजक्त देशमुख यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार 

0

नाशिक : मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या “संगीत देवबाभळी” नाटकाचे लेखक प्राजक्त देशमुख यांना यंदाचा साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या देवबाभळी या पुस्तकासाठी प्राजक्त यांना हा सन्मान मिळाला आहे. प्राजक्त यांचं संगीत देवबाभळी हे नाटक प्रचंड गाजले आहे.

दरवर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लेखकांना त्यांच्या पुस्तकासाठी प्रदान करण्यात येतो. ताम्रपत्र तसंच ५०,००० रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. २०२० चा हा पुरस्कार प्राजक्त देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे. मराठीसोबतच बंगाली साहित्यासाठीचे पुरस्कारही जाहीर करण्यात आले. बंगाली लेखक श्याम बंद्योपाध्याय यांच्या पुराणपुरूष या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

या पुरस्कारासाठी तज्ज्ञांच्या त्रिसदस्यीय समितीने काम पाहिले. या समितीमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, आशा बगे आणि लक्ष्मीकांत देशमुख यांचा समावेश होता.

पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या देवबाभळीच्या सशक्त संहितेत आवली आणि लखू यांच्यातील अनोख्या संवादातून तुकोबा नि विठ्ठलाच्या व्यक्तीमत्वातील अनोखे कंगोरे उत्कटपणे समोर येतात. लोकपरंपरा, संतपरंपरा, लोकसंस्कृती यांचा अनोखा मेळ घालत नाट्यपरंपरेतच नव्हे तर मराठी वाड्मयातही प्राजक्तनं या नाटकाच्या माध्यमातून मोलाची भर घातली आहे. 

या आधी नाशिकचे कवी ऐश्वर्य पाटेकर यांना “भुईशास्त्र” कवितासंग्रहासाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तब्बल दशकभरानंतर नाशिकच्या वाट्याला हा सन्मान आला आहे.नाशिकचे रहिवासी असलेल्या प्राजक्त देशमुख यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नाट्यवर्तुळात अतीशय आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया 

मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणाऱ्या ‘संगीत देवबाभळी’ नाटकासाठी प्राजक्त देशमुख ला युवा साहित्य अकादमी मिळणे ही नाशिकच्या नव्हे तर देशाच्या रंगभूमीसाठी अभिमानास्पद घटना आहे वि. वा. शिरवाडकर,वसंत कानेटकर यांच्या नाट्यलेखनाची परंपरा प्राजक्त समर्थपणे पुढे नेत आहे त्याचाच हा सन्मान आहे असे मी समजतो.

आधुनिक रंगभूमीवर तरुण पिढी  दमदार नाट्यलेखन व आविष्कार सादर करत आहे त्यात प्राजक्त अग्रभागी आहे. देवबाभळी ने अभूतपूर्व यश मिळवले त्यात रसिकांची रंग भाषा ,जाणीव विकसित करण्याचे काम या नाटकाने केले आहे नवा विचार दिला आहे,या पुरस्कारामुळे नव्या लेखकांना निश्चितच लिहिण्याची उमेद मिळेल आत्मविश्वास मिळेल असा मला विश्वास आहे 
प्राजक्ताच्या भविष्यकालीन वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा
विश्र्वास जयदेव ठाकूर
कार्याध्यक्ष
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक
_______ 

संगीत देवबाभळी हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातला ठळक असा मैलाचा दगड आहे. लेखक प्राजक्त देशमुख यास या नाटकाच्या लेखनाबद्दल युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर होणं, ही समकालिन मराठी रंगभूमीच्या सशक्त आशयाला मिळालेली अप्रतिम दाद आहे. मराठी नाटकाचे वाड्मयीन मूल्य अधोरेखित करणाऱ्या सशक्त नाट्यलेखकांच्या पंगतीत प्राजक्तसारखा युवा दमदार लेखक जाऊन बसला आहे! आमच्या नाटकवाल्या टीमचा सतत एक महत्वाचा भाग असलेला प्राजक्त देशमुख हा मराठी रंगभूमी आणि साहित्य क्षेत्राचं लखलखतं वर्तमान आणि उज्ज्वल भविष्य आहे. जणू मलाच पुरस्कार मिळाला, अशी आनंदाची भावना आज मनात दाटून आली आहे.

– दत्ता पाटील , नाट्यलेखक

___________

 

संगीत देवबाभळी नाटकाचे आपल्या नाशिकचे तरुण लेखक प्राजक्त देशमुख यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय याचा  मला प्रचंड आनंद झाला आहे  नाशिक रोडच्या तरुण रंगकर्मींसोबत आपल्या नाट्य कारकिर्दीची सुरुवात करणारे प्राजक्त देशमुख आज संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके तरुण लेखक बनलेय याचा आपल्यासर्वांनाच अभिमान आहे  नाशिकच्या शिरपेचात आणखी एक माना तुरा त्यांनी खोवला आहे , अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ,नाशिक शाखेच्यावतीने त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !
 
प्रा रवींद्र कदम , अध्यक्ष , अ भा म ना प , नाशिक शाखा 
_________

‘देवबाभळी’ सारखी भारतीय संस्कृतीचा उच्चार असणारी कलाकृती आजवर अनेक पुरस्कारांनी मंडित झाली.आज युवा साहित्य अकादमीसारख्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने तिचा गौरव झाला. यानिमित्ताने मराठी प्रतिभा नव्याने सर्वदूर जाणार याचा अपार आनंद आहे. म्हणूनच या कलाकृतीचे निर्माते प्राजक्त देशमुख यांच्याबद्दलचा अभिमान द्विगुणीत झाला आहे.

– स्वानंद बेदरकर

______

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या साहित्य अकादमीकडून दिला जाणारा एक महत्वाचा पुरस्कार म्हणजे 

युवा साहित्य अकादमी पुरस्कार होय. 

या वर्षी हा पुरस्कार आपल्या नाशिकच्या युवा साहित्यिक 

प्राजक्त देशमुख यांच्या देवबाभळी या पुस्तकास मिळाल्याने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

प्राजक्त आम्हाला तुझा सार्थ अभिमान वाटतो.  तुझे हार्दिक अभिनंदन। 

तुला तुझ्या पुढील साहित्यिक वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्छा। 

– विनायक रानडे 

ग्रंथ तुमच्या दारी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.