डॉ. स्वप्नील तोरणे
’महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वाटचालीमध्ये साहित्य संमेलन ही महत्वाची घटना असते. वाचकांचा, रसिकांचा सहभाग यास मोठया प्रमाणावर लाभत आहे. विसाव्या शतकाने सामाजिक, सांस्कृतिक प्रबोधनाच्या अनेक चांगल्या परंपरा निर्माण केल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे भावजीवन समृध्द झाले आहे. या पैकीच एक म्हणजे साहित्य संमेलन. आज याला आलेले महासंमेलनाचे स्वरुप डोळे दिपवून टाकणारे आहे. सुमारे दीड शतकाची वाटचाल असलेल्या परंपरेचा साहित्यरथ आज 94 व्या संमेलनाच्या उंबरठयावर आहे. या निमित्ताने डॉ. स्वप्नील तोरणे यांनी घेतलेल्या काही निवडक संमेलनांचा मागोवा…’’
साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे आगळे वेगळे सांस्कृतिक वैभव आहे. सुमारे तेरा दशकांपासून अधिक काळ साहित्याचा हा वारसा मराठी माणसाच्या सांस्कृतीक विकासाची व्याप्ती वाढवणारा ठरला आहे. या आजवरच्या ९४ साहित्य संमेलनांची मुहूर्तमेढ रोवली ती न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. १८६५ साली त्यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतला होता. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते, असे उल्लेख आहेत. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार १८७८ च्या मे पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते.ग्रंथकार संमेलन या नावाने हे संमेलन न्यायमुर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. दूसरे संमेलन सात वर्षांनी याच नावाने १८८५ साली पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. त्याचे अध्यक्ष कृष्णशास्त्री राजवाडे हे होते. पुणे सार्वजानिक सभेच्या सभागृहात आयोजित या संमेलनास सव्वाशेच्या आसपास ग्रंथकार उपस्थित होते. तिसरे ग्रंथकार संमेलन सातारा येथे तब्बल वीस वर्षानंतर रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. इतक्या मोठ्या कालावधीनंतर भरलेल्या या संमेलनात सातत्य राखण्याबाबत भरपूर चर्चा झाली. नंतरची दोन संमेलन मात्र लागोपाठच्या वर्षी भरवली गेली. चौथे ग्रंथकार संमेलन पुणे येथे १९०६ साली सदाशिव पेठेत मयेकर वाड्यात भरले होते. यासाठी पुढाकार लोकमान्य टिळक- केळकर –खाडिलकर ह्यांसारख्या दिग्गज मंडळींचा होता. याच संमेलनामध्ये २७ मे रोजी ‘महाराष्ट्र साहित्य -परिषदेची’ स्थापना करण्यात आली. ग्रंथकार संमेलनातून साहित्य- परिषदेचा जन्म झाला आणि स्वाभाविकच पुढची संमेलने भरविण्याची जबाबदारी परिषदेवर आली. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा जास्त यशस्वी व विधायक स्वरूपाचे झाले अशी चर्चा केसरी सारख्या वृत्तपत्रांतून झाली. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले.त्या काळी महाराष्ट्र राज्य नव्हते म्हणुन १९०९ साली बडोदा येथे कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
ग्रंथकारांच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा मुद्दा कीर्तीकर यांनी आपल्या भाषणात मांडला होता. ते म्हणतात, ” जर आपल्या मायभाषेला आनंदित करावयाचे असेल तर समाजाने गरीब परंतु योग्य ग्रंथकारास आपले कार्य अबाधितपणे सुरू ठेवण्यासाठी काही तरतुद करुन ठेवावयास हवी. ग्रंथ कर्तृत्वाचे कर्तव्य अव्याहत सुरू ठेवण्यासाठी योग्य ग्रंथकारांना वर्षासने द्यायवयास हवी. साहित्य परिषदांसारख्या संस्थांनी असे कार्य आपल्या शिरावर घेतले पाहिजे, जेणेकरून उत्तम ग्रंथ निर्मिती होऊ शकेल. ह्या गोष्टींचा उहापोह केल्यावाचून आम्हाला या संमेलनाचे काम पुरे झाले असे समजता येणार नाही. एकूणच साहित्यिकांच्या आस्थेबद्दलचे हे प्रतिक होते.
अकोला येथील १९१२ साली झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष हरि नारायण आपटे हे होते.मराठी भाषे संदर्भात त्यांनी सडेतोड विचार आपल्या भाषणात मांडला. ते म्हणतात, ” मातृभाषेचा अभिमान आपण सर्वांनीच धरला पाहिजे. तो ज्यांनी धरला त्यांच्या अभिमानामुळेचं मराठी भाषेला अर्थसमर्थता आली आहे. इतकी की, वाटेल ते शिक्षण तिच्याद्वारे देता येईल. वाटेल तो विचार तिच्याद्वारे उच्चारता येईल. वाटेल तो विकार तिच्याद्वारे जागृत करता येईल व वाटेल तसे लोकमनोरंजनही तिच्याद्वारे करता येईल. सारांश, वाड्मयाचे सर्व हेतु सिध्द करण्याइतके सामर्थ्य तिच्या अंगी आले आहे. त्या सामर्थ्याचा उपयोग आपण करुन तिला अधिक समर्थ करणे हे आपल्या हातात आहे.” असे हना आपटे म्हणतात.
परिषदेची अधिकृत घटना १९१२ च्या अकोल्याच्या संमेलनामध्ये मंजूर होऊन परिषदेचे कार्यालय मुंबई येथे सुरू झाले.परंतु निखळ साहित्यविषयक चळवळीला मुंबई शहर अनुकूल नव्हते हे कलांतराने लक्षात आले. संमेलने भरविण्यामध्ये पुणेकरांचा विशेष पुढाकार होता. १९२१ पर्यत परिषदेने तीन संमेलने भरविली होती १९१५ साली गंगाधरराव पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे, १९१७ साली गणेश जनार्दन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली इंदूर येथे तर १९२१ साली नरसिंह चिंतामण केळकर यांच्या अध्यक्षतेखाली बडोदे येथे संमेलन भरविण्यात आले. पुढे संमेलनाचा अध्यक्ष परिषदेने निवडायचा की स्थानिक संस्थेने असा वाद सुरू झाला. त्या वादात बडोद्याच्या ‘सहविचारांणी सभा’ ह्या स्थानिक संस्थेने संमेलनाध्ययक्ष निवडण्यात यश मिळविले. तथापि १९३२ मध्ये परिषद पुण्यास आणण्याचा ठराव होऊन. १९३३ पासून तिचे कार्यालय पुण्यास सुरू झाले. नंतर संमेलने मोठ्या प्रमाणात परिषदेमार्फतच भरविण्यात येऊ लागली.
अशा पद्धतीने साहित्य संमेलन आयोजन होऊ लागले आणि भाषा संस्कृतीच्या इतिहासात मराठीने एका ऐतेहासिक परंपरेचा प्रारंभ केला.
डॉ. स्वप्नील तोरणे
जनसंवाद तज्ज्ञ
9881734838
खूप छान ओघवती भाषा आहे लेखाची..अतिशय अभ्यासपूर्ण असा लेख आहे..धन्यवाद
उत्तम लेख. अभ्यास पूर्ण लिखाण. धन्यवाद डॉ स्वप्निल तोरणे.
अप्रतिम लेख पूर्ण वाचला
मोजक्या आणि समर्पक शब्दात अभ्यासपूर्ण माहिती साहित्य संमेलनाचा इतिहास स्वप्नील सर खूप छान
डॉ मुरलीधर भावसार
सुदंर लिहिलय..सलाम
अप्रतिम लिहिलय..सलाम