सावधान : ओमीक्रॉनचे थैमान सुरू ! खबरदारी घ्या..

डॉ. संजय धुर्जड

1

डॉ. संजय धुर्जड

सध्या जगभर नाव गाजतंय ते “ओमीक्रॉन” या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट चे. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण आफ्रिकेत हा नवीन स्ट्रेन आढळून आला आणि जगभर एकच खळबळ माजली. आता आणखी एक नवीन स्ट्रेन आला आहे आणि आता काय होणार, कसं होणार, किती दूर पसरणार, किती वेळात पसरणार, किती जीव घेणार, किती दिवस चालणार, किती हानी करणार… असे एक ना अनेक प्रश्न जगातील प्रत्येक माणसाला पडला असणार आहे. एव्हढंच नव्हे तर, आम्ही तर लस घेतलेली आहे मग आम्हाला कोरोना होणार आहे की नाही, मुलांना होणार का, आता तरी काही ठोस उपचार उपलब्ध होणार आहे की नाही, आणखी किती खर्चात पडणार आहे हा कोरोना, याही प्रश्नांची उत्तरं कुणाकडेही नाहीए. अशा या अनिश्चित, अनाकलनीय आणि आश्चर्यकारक व्हेरिएंट मुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहे, हे वेगळे सांगायला नको.

साधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओमीक्रॉनचा भारतात शिरकाव झाला. दोन डिसेंबर  रोजी एक दक्षिण आफ्रिकी व दुसरा बंगळुरातील एक डॉक्टर दोघे कोविड पॉजिटिव आल्याने त्यांची ओमीक्रॉन साठी चाचणी केली असता, ते तसे आढळून आले. दुसऱ्या आठवड्यापासून हळू हळू रुग्णसंख्या वाढू लागली. तसतसे ओमीक्रॉन ने भारतात आपले पाळे मूळे पसरण्यास सुरवात केली.

दिल्ली, मुंबई, पाठोपाठ महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, गुजरात राज्यांमध्ये केसेस आढळू लागले आणि कोविडच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले. महामारीचे गडध ढग पुन्हा एकदा देशावर दिसू लागले. हळू हळू का असेना, परंतु देशाची आणि एकंदरच सर्वसामान्य जनतेच्या जीवनाची गाडी रुळावर येत असताना पुन्हा असे काही घडणे हे कुणालाही परवडणारे नव्हते. आधीच मोडकळीला आलेले जीवन आता आणखी किती जीव खाणार, किती त्रास देणार, काय किंमत मोजून घेणार असा विचार सर्वसामान्यांच्या मनात येऊ लागला.

डिसेंबर महिन्याच्या शेवटाला अनेक तर्क-वीतर्क मांडले जाऊ लागले, अनुमान लावले जाऊ लागले, चर्चा सुरू झाल्या. शासन आणि प्रश्नांकडून निर्बंध लादले जाऊ लागले. येणाऱ्या नवीन वर्षाने काय राखून ठेवले आहे, माहीत नाही. अशातच, सर्वांनी न्यू इयर साजरे केले (बहुदा घरच्या घरी)

नाशिक शहर आणि जिल्ह्याचे चित्र बघितले तर असे लक्षात येते की ३१ डिसेंबर  पर्यंत आपल्याकडील कोविडच्या केसेस नियंत्रणात होत्या. ४० -५० असा स्थिरावलेला आकडा १ जानेवारीपासून पुढे सरकू लागला. वर्षाच्या पहिल्या दिवशी आकडा ८० वर पोहोचला. ८० वरून १२०, मग २००, ३०० असे करत आठवड्याभरात ८३२ वर जाऊन पोहोचला. म्हणजेच, एका आठवड्यात १० पटीने रुग्णसंख्येत वाढ झाली. इतक्या मोठया प्रमाणात संख्येत वाढ झाली असली तरी फारशी वाच्यता अथवा गोंधळ उडालेला दिसला नाही.

याचे मुख्य दोन कारणं आहेत. एक म्हणजे देशात, महाराष्ट्रात आणि मुंबईतील आकडे इतके प्रचंड होते की नाशिकच्या अकड्यांकडे कुणाचे लक्षच गेले नाही. दुसरे कारण असे की, शहरात कोविड रुग्णांना ऍडमिट होण्यासाठी घाई गडबड करण्याची वेळ आली नाही आणि कुठल्याही खाजगी हॉस्पिटलला लगबग दिसली नाही. अशातच, सर्व माध्यमांमध्ये कोविड आणि ओमीक्रॉन चे मथळे असलेल्या बातम्या झळकू लागल्या, परंतु त्या वेगळ्या कारणांमुळे. राज्यातील सर्व अनेक आमदार, खासदार, मंत्री, सिनेस्टार, डॉक्टर्स आणि समाजातील उच्चभ्रू व्यक्ती पॉजिटिव्ह आल्याच्या बातम्या पसरू लागल्या.

जिथे इतके महान महान हस्ती पॉजिटिव्ह आलेत तर तिथे सर्वसामान्यांना कोण विचारणार ? यामुळेही कदाचित वाढत्या आकड्यांना कुणी जास्त गांभीर्याने घेतले नसावे. एक आठवड्यात दहा पटीने रुग्णसंख्या वाढली असेल तर येणाऱ्या काही दिवसांत आपण काळजी न घेतल्यास काय चित्र असेल, याचा विचार न केलेलाच बरा.

आता आपल्याला अनेक प्रश्न पडले असतील. इतके सारे रुग्ण वाढले असले तरी ऍडमिट होण्याची गरज का पडली नाही ? हॉस्पिटल्स का भरले गेले नाही ? शासन पातळीवर काय उपायोजना केल्या जात आहे ? पुढील काळात किती वाढ होणार आहे ? मृत्युदर किती असणार आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा माझा हा प्रयत्न आहे.

मुळात, ओमीक्रॉन या व्हेरिएंट बद्दल तर्क वीतर्क बांधणे सुरू आहे. अजूनही ठोस असे काही सांगणे कठीण आहे. तरी काही बाबींबद्दल माहिती संकलित केली असता असे आढळून आले की ओमीक्रॉन हा कोविडचा सौम्य प्रकार आहे. अनेक रुग्णांना कोविड सदृश लक्षणे असतात. ताप, सर्दी,  खोकला, अशक्तपणा, चव आणि गंध नसणे असे सौम्य लक्षणे दिसतात.

अधिक तीव्र स्वरूपात दम लागणे, छाती दुखणे, बोलण्यास अडथळा येणे, ऑक्सिजन ची पातळी कमी होणे अशा प्रकारचा त्रास जाणवू लागतो. निदान करण्यासाठी RT-PCR, रॅपिड अँटीजेन टेस्ट आणि छातीचा सिटी स्कॅन या स्टॅंडर्ड टेस्ट आहेत. उपचारही जवळपास पूर्वीप्रमाणेच असणार आहे. मग, पुन्हा आपण विचाराल, की यात वेगळं ते काय आहे असे… घाबरण्यासारखे…?

या व्हायरस चा प्रसरणाचा वेग प्रचंड आहे. एक आठवड्यात दहा पट वाढू शकतो, एका दिवसांत लाखांनी रुग्णसंख्या वाढू शकते. पुढील महिन्याभरात देशातील बहुतांश लोकसंख्या बाधित होऊ शकते असा अंदाज बांधला जातो आहे.आजार जरी सौम्य असला तरी, किमान ३ -४ % रुग्णांना ऍडमिट होण्याची गरज पडली तरी लाखो रुग्ण वाढले तर ऍडमिट होणाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये असेल आणि हजारो रुग्ण वाढले तरी ऍडमिट होणारे शेकडोने असतील.

कोविडचा आजवरचा मृत्युदर १.५% हुन कमी आहे. या व्हेरिएंट चा मृत्युदर अर्धा टक्का जरी असला तरी दगावणाऱ्यांची संख्या किती असणार ! उदा. नाशिकमध्ये पहिल्या लाटेत दिवसाकाठी उच्चांकी रुग्णसंख्या सोळाशे सतराशे इतकी होती. दुसऱ्या लाटेत तीच उच्चांकी संख्या ५ – ६ हजारांवर होती. अनुमान आहे की या लाटेत दिवसाची उच्चांकी रुग्णसंख्या १० – १२ हजार असण्याची शक्यता आहे. यातील ३% रुग्णांना ऍडमिट करण्याची गरज पडली तरी रोज ३००-३५० नवीन रुग्ण ऍडमिट होतील. लाट उसळली तरी भरकन असणार,आणि त्याच वेगाने खाली येणार. हीच एक दिलासादायक बाब आहे, की लाट कमी काळासाठी असेल. परंतु, कमी वेळात जास्तीत जास्त हानी होण्याची शक्यता असल्याने, प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, हे सांगणे क्रमप्राप्त आहे.

सौम्य म्हणून, ओमीक्रॉन ला कमी लेखण्याची गलती होऊ नये, गाफील राहणे म्हणजे जीवाशी हात धुवून बसणे. अफवांवर विश्वास न ठेवता, शास्त्रोक्त माहितीवर भर द्यावा. अगदी गरजेचे असेल, असेच कामे हाती घ्यावे, अन्यथा ३ – ४ महिने पुढे ढकलावे, असे करणे शहाणपणाचे ठरेल. बाकी आपण सुज्ञ आहात, जबाबदार आहात. आपली स्वतःची, कुटुंबाची, देशाची आणि मानवतेची काळजी घ्यावी, हीच नम्र विनंती.

Dr. Sanjay Dhurjad
                                                                                                                    डॉ. संजय धुर्जड

डॉ. संजय धुर्जड
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. Sanjay gite says

    उत्तम माहिती धन्यवाद जनस्थान धन्यवाद डॉ संजय दुर्जड

कॉपी करू नका.