शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन 

'जाणता राजा' घराघरात पोहोचवणारा तारा निखळला

0

पुणे –   शिवाजी महाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवणारे ,पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते १०० वर्षांचे होते. बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

न्यूमोनियाचा संसर्ग झाल्यानं गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज सकाळी पहाटे ५.०७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतीच वयाची शंभरी गाठली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील व्हिडीओ च्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

त्यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या घरी सकाळी आठ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून दुपारी बारा नंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात चिरंजीव अमृत आणि प्रसाद तसेच कन्या माधुरी असा परिवार आहे. पुरंदरे यांच्या कन्या माधुरी या ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि गायिका आहेत. ज्येष्ठ चिरंजीव अमृत हे पुरंदरे प्रकाशनची जबाबदारी समर्थपणे सांभाळतात तर, लहान चिरंजीव प्रसाद यांनी नाट्य तसेच दुचाकींच्या क्रीडा प्रकारात काम केले आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांचे खरे नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असे होते. पुण्याजवळील सासवड य़ेथे २९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवाजी महाराजांवर त्यांची अपार श्रद्धा होती. बाबासाहेबांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्यानं दिली. तर, जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले.   महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि मराठा साम्राज्य यावर त्यांचा अभ्यास होता. बाबासाहेब पुरंदरे यांची ऐतिहासिक लेखावर विशेष पकड होती. त्यांच्या खास शैलीत त्यांनी लिहलेले वर्णात्मक लेख वाचताना शिवबाच डोळ्यासमोर उभे राहत. आपल्या शब्दातून ते महाराष्ट्राचा इतिहासच डोळ्यासमोर उभा करत.

बाबासाहेब पुरंदरे यांना लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरच महाराष्ट्राच्या इतिहासाबदद्ल कमालीची उत्सुकता होती. यातूनच लहानपणापासून ते त्यांच्या वडीलांबरोबर किल्ले, वाडे , प्राचीन मंदिर पाहण्यास जात. त्यांचा इतिहास जाणून घेत आणि त्याची टिप्पणे काढून ठेवत. त्यातूनच त्यांना इतिहासाचे अनेक संदर्भ भेटत. त्यातूनच त्यांनी पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाबरोबर इतिहास संशोधकाचे काम केले. याच अभ्यासातून त्यांनी ललित कादंबरीबरोबरच जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शनही केले . जाणता राजाचे आतापर्य़ंत १२५० प्रयोग झाले असून या नाटकाच्या प्रयोगात महाराष्ट्राचा चालता बोलता इतिहासच मांडला जातो. बाबासाहेब पुरंदरे यांना २०१५ साली महाराष्ट्रभूषण आणि २०१९ साली पद्मविभूषण पुरुस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

बाबासाहेब पुरंदरे यांनी ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शनवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या १६ आवृत्ती प्रकाशित झाल्या असून ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.

“असा अलौकिक शिवआराधक होणे नाही..शिवशाहीर शिव चरणी लीन…!”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांकडून तीव्र शोक व्यक्त

पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केले आहे. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोकही व्यक्त केला आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेंबाच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहचले. त्यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला. घरा-घरात शिवभक्त निर्माण व्हावेत आणि या शिवभक्तांना त्यांच्या आराध्याच्या तेजःपुंज पैलूंचे दर्शन घडवावे, यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानले. दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथेही शिवराय चरणी लीन होतील. शिवमहिमा, शिवरायांच्या दिगंत किर्तीची कवने लिहीण्यात आणि ती तडफदार आवाजात, आवेशात पोहचवण्यासाठी दंग होतील. पुरंदरेवाडा हा अनेकांसाठी अनेक अर्थांनी आधार होता. हा आधारवड त्यांच्या निधनामुळे अंतर्धान पावला आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव भासत राहील. शिवचरित्राच्या अखंड पारायणालाच आयुष्य मानणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो अशी जगदंबा चरणी प्रार्थना. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची हानी

पद्मविभूषण बाबासाहेबांच्या निधनानं एक अध्याय पडद्याआड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

“ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने तेजस्वी शिवतारा निखळला : राज्यपालांची शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.लोककल्याणकारी छत्रपती शिवरायांचे चरित्र आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जागविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे उत्तुंग प्रतिभेचे अलौकिक व्यक्तित्व होते. त्यांचे भावविश्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारावले होते. त्यांच्या प्रत्येक श्वासात महाराजांचा ध्यास होता. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या लिखाणातून, व्याख्यानांमधून तसेच ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्यामधून त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे पुण्यकार्य केले.

अलीकडेच शिवसृष्टी येथे भेट दिली असता व त्यानंतर एका पुरस्कार सोहळ्यासाठी ते राजभवन येथे आले असताना त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे भाग्य लाभले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने भारतवर्षाच्या आसमंतातील एक तेजस्वी शिवतारा निखळला आहे. त्यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी साकारणे व शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वदूर पोहोचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

महाराष्ट्रात येऊन शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे व त्यांचा स्नेह आपणांस मिळणे ही आपली जीवनातली एक मोठी उपलब्धी आहे असे आपण मानतो. त्यामुळे त्यांचे निधन हे आपल्याकरिता वैयक्तिक स्तरावर देखील दुःखदायक आहे. या दुःखद प्रसंगी आपल्या तीव्र शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.